पुणे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक रिंगणातील जय भवानी पॅनेल आणि विरोधातील श्री छत्रपती बचाव पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. काझड (ता. इंदापूर) येथे आयोजित सभेत कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी लोकसभा, विधानसभेच्या कामकाजाप्रमाणे छत्रपती साखर कारखान्याच्या सभासदांनाही संचालक मंडळाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय करणार आहे, असे जाहीर केले. ते म्हणाले की, छत्रपती साखर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काटकसरीने कारभार केला जाईल. संचालक मंडळ चांगले काम करते की नाही, हे पाहण्याची सोय केली जाईल. यावेळी बाळासाहेब कोळेकर, अनिल काटे, रामचंद्र निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, बाळासाहेब पाटील. तानाजी पाटील, अजित पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
भवानीनगर (ता. इंदापूर) येथे भवानीमाता मंदिरामध्ये श्री छत्रपती बचाव पॅनेलच्या प्रचाराच्या प्रारंभाची सभा नुकतीच झाली. कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप म्हणाले की, छत्रपती कारखान्याचा कारभार मी, माझे वडील दिवंगत राजेंद्रकुमार घोलप, बंधू अमरसिंह घोलप यांनी निःस्वार्थीपणे केला आहे. श्री छत्रपती बचाव पॅनेलच्या १५ उमेदवारांना सभासदांनी निवडून द्यावे. त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम करण्याची ग्वाही मी देतो. यावेळी छत्रपती कारखान्याचे माजी संचालक तानाजी थोरात, मुरलीधर निंबाळकर, तुकाराम काळे, अविनाश मोटे आदी उपस्थित होते. सन २००९ – १० मी कारखान्याचा अध्यक्ष असताना २६०१ रुपये प्रतिटन उच्चांकी दर दिला होता अशी आठवणही घोलप यांनी करून दिली. यावेळी कारखान्याचे माजी संचालक तानाजी थोरात, माजी संचालक मुरलीधर निंबाळकर यांची भाषणे झाली.