सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील आवताडे शुगरच्या बगॅसला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून अंदाजे ५००० मेट्रिक टन लूज बगॅस जळाला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. या आगीमध्ये सुमारे २ कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे. शुक्रवारी दुपारी ३.३० च्या दरम्यान कारखान्याच्या लूज बगॅसला अचानक भीषण आग लागली. त्यामध्ये अंदाजे ५००० मेट्रिक टन लूज बगॅस जळाला आहे.
आग लागल्याची माहिती कारखाना कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाच्या मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला व लोकमंगल शुगर, भंडारकवठे येथील अधिकाऱ्यांना संपर्क साधून अग्निशामक यंत्रणा बोलावून घेतली व लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आवताडे शुगरचा तिसरा गाळप हंगाम संपला असून अचानक लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले असल्याचे माहिती कार्यकारी संचालक मोहन पिसे यांनी सांगितले.