कोल्हापूर : गंगानगर येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक अथवा प्रशासक मंडळ नियुक्त करावे, यासाठी हालचाली सुरू होत्या; परंतु न्यायालयाने प्रशासक नियुक्तीसंदर्भात प्राधिकरणाने सक्तीची पावले उचलू नयेत, असे निर्देश देत कार्यकारी संचालक नंदकुमार भोरे यांच्या सहीने कामकाज सुरू ठेवावे, असे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची पुढील सुनावणी नऊ जून रोजी होणार आहे. चार महिन्यांपूर्वी कारखान्याची निवडणूक चेअरमन पी. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली होती. त्यावर रजनीताई मगदूम यांच्या समर्थकांनी आक्षेप घेतला आहे.
केंद्रीय सहकार विभागाकडे रजनीताई मगदूम यांच्या समर्थकांनी तक्रार केली होती. कारखान्याची निवडणूक प्रक्रिया राबविताना चुकीच्या पद्धतीने निकष लावून विरोधकांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध झाली आहे,’ असा आक्षेप घेतला गेला होता. त्याची दखल घेत न्यायालयाने संचालक मंडळास मान्यता न देता नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. याला बाबासाहेब मगदूम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर न्यायालयात सुनावणी होऊन निवडणूक कार्यक्रम स्थगित केला होता. दरम्यानच्या काळात कारखान्याचे कामकाज ठप्प झाले आहे.