सोलापूर : ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी चांदापुरी येथील साखर कारखाना ताब्यात घेतला. परिसरातील ऊसाचे गाळप करून शेतकऱ्यांच्या उसाला समाधानकारक दर दिला. रोजगार निर्मिती केली व नव्यानेच उपपदार्थ निर्मिती प्रकल्प हाती घेऊन माळशिरस तालुक्याच्या विकासात भर टाकण्याचे काम केले, असे प्रतिपादन शेकाप नेते जयंत पाटील यांनी केले. कारखान्यात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री संभाजीराव पाटील- निलंगेकर होते.
संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी बोत्रे-पाटील कमी कालावधीत नऊ साखर कारखाने व्यवस्थित चालविल्याबद्दल ओंकार परिवाराचे कौतूक केले. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, दादासाहेब फराटे पाटील, दादासाहेब बोजे पाटील, ओंकाराच्या संचालिका रेखाताई बोत्रे पाटील, संचालक प्रशांत बोत्रे पाटील, ओमराजे बोत्रे पाटील उपस्थित होते. चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी आभार मानले.