जालना : अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अंकुशनगर युनिट आणि सागर-तीर्थपुरी युनिटमध्ये एकूण २२ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक व माजी मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आगामी गळीत हंगाम २०२५-२६ साठी ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार, मजुरांची आढावा बैठक नुकतीच झाली. यावेळी ते बोलत होते.
बैठकीत कारखान्याच्या ऊस तोडणी, वाहतूक विषयक धोरण, अॅडव्हान्स वाटपाचे नियोजन व कंत्राटदार मजुरांच्या अडी-अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी मंत्री टोपे यांनी सांगितले की, दैनंदिन गाळप क्षमतेनुसार पुरेशा उसाचा पुरवठा व्हावा यासाठी ट्रक, डबल ट्रॉली ट्रॅक्टर, छोटे ट्रॅक्टर, टायर गाडी व हार्वेस्टर यंत्रणेशी ऊस तोड व वाहतुकीचे करार करण्यात येत आहेत. यावेळी कारखान्याच्या शेती विभागाच्या अहवालानुसार कार्यक्षेत्रात २५ लाख मे. टन ऊस उपलब्धतेचा अंदाज आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे अंकुशनगर युनिटमध्ये १५ लाख व तर सागर-तीर्थपुरीकडे ७ लाख असे गाळप उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.