पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गेल्यावर्षी सन २०२४- २५ मध्ये गळीत झालेल्या उसासाठी प्रतिटन दोनशे रुपये खोडकी पेमेंट देण्यासह विविध धोरणात्मक निर्णय जाहीर केले. उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, कार्यकारी संचालक अशोकपाटील आदी प्रमुख उपस्थित होते. एकरकमी ३१३२ रुपये एफआरपी दिलेल्या या कारखान्याच्या सभासदांना २०० रुपये प्रती टन खोडकी बिल मिळणार आहे. यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.
माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा दि. २० रोजी होण्याची शक्यता आहे. ही पार्श्वभूमी व आचारसंहिता विचारात घेता संचालक मंडळाने बैठक घेऊन खोडकी पेमेंटची घोषणा केली. कारखान्याने यापूर्वी १ ते १५ मार्चच्या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे बिल ३१३२ रुपये एकरकमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे. आता सभासदांना दोनशे रुपये प्रतिटन खोडकी पेमेंट जाहीर केले. आधी दिलेले ३१३२ रुपये आणि आता खोडकी पेमेंटचे प्रतिटन दोनशे रुपये असे एकूण ३३३२ रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.