अहिल्यानगर : तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणात १७३ इच्छूक उमेदवार आहेत. माघारीची मुदत तीन दिवसांवर आली आहे. आठवडा उलटत असताना एकाही इच्छुकाने माघारीचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कारखाना निवडणूक बिनविरोध होण्याची आशा धूसर दिसत आहे. सर्वांचे लक्ष १६ मे रोजी माघारीच्या शेवटच्या दिवसाकडे लागले आहे. यानंतर कारखान्याची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी, याचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.
तनपुरे कारखान्यासाठी भाजपकडून आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनात विखे, कर्डिले गटासह भाजप मित्र पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. तनपुरे गटाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे मैदानात उतरलेले आहे. संभाजी प्रतिष्ठानचे राजूभाऊ शेटे यांनीही निवडणुकीत दमदार उमेदवार देण्यासाठी बांधणी केली आहे. कारखाना बचाव कृती समितीने गटागटात बैठका सुरू करीत कारखाना सुरू करण्याबाबत सभासद, कामगारांपुढे आपली आगामी व्यूवहरचना मांडण्यास प्रारंभ केला आहे.
दरम्यान, कारखाना निवडणुकीत उतरण्यासाठी इच्छूक उमेदवारांना सभासद शेअर्स रक्कम भरणे महत्वाचे होते. मोठ्या प्रमाणात इच्छूक असल्याने सभासद शेअर्स रक्कम मोठ्या प्रमाणात जमा झाली. सुमारे ३० लाखाची रक्कम जमा होऊन त्याचा लाभ कारखाना कामगारांना होईल, अशी अपेक्षा लागलेली आहे. कारखाना बिनविरोध व्हावा यासाठी देवळाली प्रवरेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी बैठकीची घोषणा केली आहे. त्या बैठकीला कोणते राजकीय नेते सहमती दर्शवतात याची उत्सुकता आहे.