महाराष्ट्र : राज्यात सहकारी साखर कारखानदारीसमोर खाजगी कारखानदारीचे मोठे आव्हान !

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने गेल्या मंगळवारी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या एका परिसंवादात ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांनी सहकार चळवळीसह या क्षेत्रातील साखर कारखानदारीच्या आजच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. सहकारी साखर कारखाने बुडवणार्‍यांनीच आपले कारखाने खाजगीरित्या विकत घेतल्याचे पवारांनी नमूद केले होते. गेल्या काही वर्षात राज्यातील सहकारी साखर कारखानदारीचा प्रचंड ऱ्हास झाला असून खाजगी साखर कारखानदारीने तगडे आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे राज्यातील जे सहकारी साखर कारखाने विविध कारणांनी बंद पडले होते, तेच कारखाने खाजगी झाल्यानंतर मात्र फायद्यात सुरु आहेत. हा चमत्कार कसा काय झाला, असा सवाल वारंवार उपस्थित केला जात आहे.

मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये एकंदर ५१ साखर कारखाने असून त्यातील निम्म्याहून जास्त म्हणजे २८ साखर कारखाने खाजगी असून २३ कारखाने सहकारी असल्याचे २०२४-२५च्या गाळप हंगामाच्या अहवालातून दिसून येते. राज्यात एकेकाळी सहकारी साखर कारखान्यांची संख्या २०९ होती. ती आता १०३ पर्यंत खाली आली आहे. सरलेल्या हंगामात १०४ खाजगी कारखान्यांमध्ये उसाचे गाळप झाले. नांदेड जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात प्रारंभी ७ सहकारी साखर कारखाने होते, मात्र काळाच्या ओघात त्यातील सहा कारखाने बंद झाले. सध्या जिल्ह्यात भाऊराव चव्हाण हा एकमेव सहकारी साखर कारखाना उरला आहे. ४ सहकारी साखर कारखाने खाजगी झाले. मागील काही वर्षांत जिल्ह्यात एका नव्या खाजगी कारखान्याची भर पडली. सहकार क्षेत्रातील दोन कारखाने कर्जबाजारीपणामुळे बंद आहेत.

साखर आयुक्तालयाने राज्यातील साखर उद्योगाची आठ विभागांमध्ये विभागणी केली आहे. त्यात कोल्हापूर हा सर्वात मोठा विभाग असून या विभागात सहकार व खाजगी कारखान्यांची संख्या २६ आणि १४ अशी आहे. सोलापूर विभागात २८ खाजगी तर १७ सहकारी साखर कारखाने आहेत. नांदेड विभागात १९ खाजगी आणि १० सहकारी साखर कारखाने आहेत. विदर्भातील दोन विभागात ७ पैकी ६ कारखाने खाजगी क्षेत्रात आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही 12 खाजगी कारखाने आहेत. या विभागात १४ सहकारी साखर कारखाने आहेत. कोल्हापूर आणि पुणे हे दोन विभाग सहकारी साखर कारखानदारीच्या बाबतीत (संख्या २६ व १८) अव्वल स्थान राखून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here