अहिल्यानगर : राहुरी तालुक्याची कामधेनू डॉ. तनपुरे साखर कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या आवाहनाला तालुक्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी प्रतिसाद देत बैठकीत भूमिका मांडली. यासाठी सर्व पॅनलच्या प्रमुख मंडळींनी आपापल्या वरिष्ठांशी चर्चा करून कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, असा निर्णय घेण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, रावसाहेब चाचा तनपुरे, राजुभाऊ शेटे, तान्हाजी धसाळ, रवी मोरे, उत्तम म्हसे, बाळासाहेब खुळे, सुरेश बानकर, शामराव निमसे, धनंजय गाडे, विक्रम तांबे, देवेंद्र लांबे, अमोल भनगडे, रवी म्हसे, विजय डौले, अण्णा बाचकर, दत्ता कवाणे, सुधीर तनपुरे, सतीश बोरुडे, प्रकाश संसारे, शहाजी कदम, अमोल कदम, संतोष चव्हाण, गणेश मुसमाडे, गोरख घाडगे, नारायण घाडगे, राहुल तमनर, कारभारी खुळे उपस्थित होते.
रावसाहेब चाचा तनपुरे म्हणाले, राहुरी कारखाना हा बिनविरोध झाला पाहिजे, ही माझी पहिल्यापासून इच्छा आहे. कारखाना बंद असल्याने राहुरी कारखाना, देवळाली प्रवरासह आसपासच्या गावांतील बाजारपेठा उध्वस्त झाल्या आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्याच कारखानदाराला राहुरी कारखाना सुरू व्हावा असे वाटत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवी मोरे यांनी कारखाना बिनविरोध करण्यासंदर्भात सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेउन चार पॅनलच्या प्रमुख लोकांना सोबत घेऊन निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली.
राजूभाऊ शेटे यांनी कारखाना बिनविरोध करायचा ही भूमिका योग्य परंतु कोण लोक घ्यायचे, कारखाना कसा चालू करायचा, बँकेचं देणं कस द्यायचं, शेतकऱ्यांचं व कामगारांचं देणं द्यायचं कसे याचा विचार करणे महत्वाच आहे असे म्हंटले. सत्यजित कदम यांनी सर्वांनी एकत्रित मनाचा मोठेपणा दाखवून कारखाना बिनविरोध करण्यासाठी पुढे येणे आवश्यक असल्याचे म्हंटले आहे.