सातारा : राज्यात अनेक ठिकाणी वळवाचा पाऊस झाला आहे. अशा काळात हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ऊस, भुईमूग, भात, भुईमूग यांसारख्या इतर पिकांची मुळे खाऊन पिकांचे मोठे नुकसान करणाऱ्या हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी ‘प्रकाश सापळा’ हा एकमेव उपाय असून, याचा अवलंब १५ जून ते १५ अखेर करण्याचे आवाहन कोरेगाव तालुका शेती विभागाने केले आहे. खरीप पूर्व हंगाम मोहिमेंतर्गत येथील सयाजी बर्गे यांच्या शेतात हुमणी किडा नियंत्रक प्रकाश सापळ्याचे प्रात्यक्षिक कृषी पर्यवेक्षक अर्जुन भोसले यांनी करून दाखवले.
यावेळी कोरेगाव ग्राम विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष नारायण बर्गे, रविकिरण जाधव, प्रगतशील शेतकरी शिवाजी बर्गे, सुजय आदी उपस्थित होते. भोसले यांनी हुमणी किडा, त्याचा जीवनक्रम याबाबतची माहिती दिली. हुमणीचा प्रौढ किडा हा १५ मे ते १५ जूनदरम्यान जेव्हा वळवाचा पाऊस पडतो, या कालावधीत जमिनीतून बाहेर पडतो. एक मादी भुंगेरा साधारणपणे ८० अंडी देते. शेतकऱ्यांनी ही वेळ साधून जर प्रकाश सापळा लावला, तर त्यात या प्रौढ किड्याचा नायनाट करणे शक्य होऊ शकते व अंडी घालण्यापूर्वी त्यांचा नाश होतो अशी माहिती मंडल कृषी अधिकारी संकेत धुमाळ यांनी दिली. प्रकाश सापळा हा प्रामुख्याने शेताच्या बांधावर असलेल्या बाभळ, कडुलिंब आदी या झाडांच्या जवळपास लावावा असे आवाहन त्यांनी केले.