अहिल्यानगर : ओंकार शुगर ग्रुपच्या हिरडगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथील गौरी शुगर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२५-२६ करिता ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांच्या कराराचा प्रारंभ ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाल्याची माहिती कार्यकारी संचालक रोहिदास यांनी दिली. गळीत हंगाम २०२५-२६ करिता गौरी शुगर अँड डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ट्रक, ट्रॅक्टर, जुगाड टायरगाडी व हार्वेस्टर मशिन यांचे तोडणी आणि वाहतुकीचे कराराचा ऊस उत्पादक व कामगार यांच्या हस्ते रविवारी (ता.१८) सुरू करण्यात आले.
येत्या गळीत हंगामासाठी ४०९ वाहन टोळी, २५० ट्रॅक्टर जुगाड १०९ टायर गाडी व दहा हार्वेस्टर मशिनचे करार करण्यास सुरुवात झाली आहे. मागील गळीत हंगामाप्रमाणे यावर्षी कारखाना व्यवस्थित चालवून शेतकरी वाहतूकदार व कामगार यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावेळेस कारखान्याचे कार्यकारी संचालक रोहिदास यादव यांनी तोडणी वाहतूकदार व कर्मचारी यांना करारासंदर्भात सूचना केल्या. गतवर्षी कारखान्याने सात लाख १५ हजार, ४१९ टनाचे गाळप केले. त्यामध्ये श्रीगोंदा शिरूर कर्जत जामखेड दौंड आष्टी करमाळामधील ऊस उत्पादक शेतकरी यांनी विश्वास दाखवला. त्याप्रमाणे येऊ घातलेल्या गळीत हंगामातही शेतकऱ्यांनी गौरी शुगरला गळितासाठी ऊस घालावा, असे आवाहन केले.