पुणे : ‘माळेगाव’ची पंचवार्षिक निवडणूक शासनस्तरावर जाहीर झाल्याने २१ ते २७ मे पासून उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. तर मतदान २२ जून रोजी होणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेचा कालावधी जवळ आल्याने सर्वच नेते मंडळी, इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते वेगाने निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सत्ताधारी, भाजप पक्षाचे विरोधक व कष्टकरी शेतकरी समितीने संभाव्य उमेदवारांच्या नावांसाठी चाचपणी सुरू केली आहे.
बारामती तालुक्याच्या राजकारणात माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला खूप महत्त्व आहे. निवडणूक जाहीर होताच उमेदवारांच्या नावांची चाचपणी करण्यासाठी गावोगावी संबंधित पदाधिकाऱ्यांचा गुप्त बैठकांचा धडाका सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे, संचालक मदनराव देवकाते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर आदींचा समावेश आहे. विरोधी गट भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी काही संभाव्य उमेदवारांशी चर्चा केली आहे. कष्टकरी समितीने ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नसल्याचे सांगत त्यादृष्टीने आमचीही तयारी सुरू असल्याचे सांगितले. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. युगेंद्र पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.