बीड : सद्यस्थितीत ऊस पिकामध्ये निदर्शनास येत असलेल्या चाबुक काणी, गवताळ वाढ, कांडी कीड तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या हुमणी अळी व्यवस्थापनाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने नॅचरल शुगरचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक बी. बी. ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी सुर्डी, मांग वडगाव, माळेगाव, सोनेसांगवी या गावातील शेतकऱ्यांची सुर्डी फाटा येथे कार्यशाळा आयोजित करून ऊस पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले.
येळकर म्हणाले, मे महिन्यात अवकाळी पाऊस पडल्यामुळे कडुनिंबाच्या झाडावर हुमणी अळीचे प्रौढ निदर्शनास येत असल्याने हुमणी अळी प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी प्रकाश सापळे, एरंड सापळे, कामगंध सापळे लावणे फायद्याचे असल्याचे सांगितले. त्यांनी सोयाबीन पिकामधील पिवळा मोझॅक विषाणू आणि सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरतेमुळे निर्माण होणारा पिवळसरपणा यामधील फरक आणि याचे व्यवस्थापन तसेच ऊस पिकामधील चाबुक काणी, गवताळ वाढ रोग आणि पोंगेमर, लोकरी मावा, पिठ्या ढेकूण व्यवस्थापन संदर्भात विस्तृतपणे मार्गदर्शन केले. यावेळी बळीराम लोकरे, कृषी पर्यवेक्षक नागेश येवले, वैभव भिसे, किशोर फरकांडे, प्रगतिशील शेतकरी बब्रुवान कणसे, धनराज पवार यांच्यासह इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…असा तयार करा एरंडी आंबवन सापळा
२ किलो एरंडी बिया ठेचुन त्यात १०० मिली ताक किंवा बेकरीतील २५ ग्रॅम इस्ट पावडर व ५० ग्रॅम बेसन पीठ एकत्र करुन १ ते १.५ लिटर पाण्यात टाकुन मिश्रण ढवळून घ्यावे तयार मिश्रण पसरट अंडाकृती मातीच्या मडक्यामध्ये दोन दिवस आंबवून घ्यावे. दोन दिवसानंतर मडके अर्धे होईल इतके पाणी मिश्रणात मिसळावे व मडक्याचे तोंड उघडे ठेवुन मडके पिकामध्ये किंवा पिकालगतच्या कडुलिंब बाभळ बोर चिंच या झाडाखाली जमिनीत अर्धे पुरावे. या द्रावणात असंख्य प्रमाणात हुमणीचे प्रौढ भुंगेरे अडकून नष्ट होतात.
..असे करा ऊसातील चाबुक काणी, गवताळ वाढ, कांडी कीड व्यवस्थापन
* चाबुक काणी प्रादुर्भावग्रस्त उसाचे फुटवे विळ्याने कापून घेऊन त्याची काजळी शेतामध्ये पडू न देता व्यवस्थित प्लास्टिकच्या पोत्यात भरून शेता बाहेर नेऊन जाळून टाकावेत त्यानंतर जमिनीखाली राहिलेले उसाचे बेट इतर अवशेष काढून नष्ट करावेत यामुळे रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल.
* ऊस पिकात काणी रोगाचे प्रमाण ३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास अशा पिकाचा खोडवा घेऊ नये.
* चाबुक काणी रोगाच्या प्रादुर्भाव व्यवस्थापनासाठी ॲझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के अधिक डायफेनोकोनाझोल ११.४ टक्के एससी या संयुक्त बुरशीनाशकाची १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
* गवताळ वाढीची बेटे आढळल्यास ती मुळासकट काढून जाळून नष्ट करावीत.
* फुले २६५ ऊस जातीच्या संकरातून तयार झालेल्या ऊस जातीमध्ये तांबेरा, पानांवरील तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगांच्या व्यवस्थापनासाठी ३ ग्रॅम मॅन्कोझेब प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
* ऊस पिकातील कांडी कीड व्यवस्थापनासाठी क्लोरअँट्रानिलीप्रोल (०.४ टक्का) हे दाणेदार कीटकनाशक हेक्टरी १८.७५ किलो याप्रमाणे पावसाळी खतासोबत पेरून द्यावे.