बारामती : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप, शिंदे शिवसेनेला झटका देत सर्व 21 जागांवर विजय मिळवला. सोमवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून अजित पवारांच्या ‘श्री जय भवानी माता’ पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर राहिले. रात्री उशिरापर्यंत ही मतमोजणी चालू होती.
छत्रपती कारखान्याच्या 22681 मतदारांपैकी 16 हजार हून अधिक मतदारांनी मतदान केले. मतमोजणीत पहिल्या टप्प्यापासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील श्री जय भवानी माता पॅनलने आघाडी घेतली. जय भवानी माता पॅनलच्या वतीने पुढील सलग पाच वर्ष अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज जाचक यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्यांचा पहिलाच मतदार संघाचा गट होता. या गटात जाचक यांनी मोठी आघाडी घेतली आणि त्यानंतर तोच ट्रेंड दिवसभर कायम राहिला.
छत्रपती सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासदांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कृती समितीच्या बाजूने आपला कौल दिल्याचे दिसून आले. अजित पवार व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची युती झाल्यामुळे निवडणूक एकतर्फी होईल, असे चित्र निर्माण झाले होते. छत्रपती वाचविण्यासाठी निवडणूक महत्वाची असल्यामुळे सभासदांनी पवार -जाचक यांच्या युतीच्या पॅनेलवरती विश्वास ठेवून श्री जय भवानीमाता पॅनेलकडे एकहाती सत्ता दिली.