बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील पतसंस्थांनी हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना प्रगतीपथावर नेण्यासाठी हातभार लावावा. आपल्या ठेवी माझ्या विश्वासावर बिरेश्वर संस्थेत ठेवून कारखाना चांगल्याप्रमाणे चालविण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी. कारखान्याच्या विकासकामासाठी सहकारी संस्थांनी दिलेल्या ठेवीची पूर्णपणे जबाबदारी बिरेश्वर सहकारी संस्था घेईल, असे आवाहन माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केले. हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातर्फे आयोजित हुक्केरी तालुक्यातील सर्व पतसंस्था पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
माजी खासदार जोल्ले म्हणाले की, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन, आरोग्य विमा, ग्रॅज्युटी, गोडाऊन, वसाहत, मंगल कार्यालय, महादेव मंदिर, शेतकरी सेवा भवन, बॉयलर दुरुस्तीसह इथेनॉल घटक व विद्युत घटक सुरू करण्यात येणार आहे. हिरण्यकेशी साखर कारखाना प्रगतीपथावर नेण्यासाठी पतसंस्थांचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक पट्टणशेट्टी यांनी स्वागत केले. अध्यक्ष बसवराज कल्लट्टी, संचालक शिवनायक नायक, प्रभूदेव पाटील, मलिकार्जुन पाटील, सुरेश रायमाने, शारदा पाटील, भारती हंजी, बसवराज बागलकोटी, शिवगोंडा पाटील, गंगाधर गड्डी, मधू खोत, बाहुबली नांगनुरी आदी उपस्थित होते. लक्ष्मण हंचिनमणी यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश नाशिपुडी यांनी आभार मानले.