केरळमध्ये आज, नैऋत्य मान्सून आपल्या नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा जवळजवळ एक आठवडा आधीच दाखल झाला आहे. गेल्या १६ वर्षांत प्रथमच यावर्षी केरळमध्ये मान्सूनचे आगमन इतक्या लवकर झाले आहे.
भारतीय हवामान खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, नैऋत्य मान्सून आज, २४ मे २०२५ रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. हा मान्सून नेहमीच्या १ जून या तारखेपेक्षा खूप लवकर आला आहे. नैऋत्य मान्सून सामान्य तारखेपेक्षा ८ दिवस आधी केरळमध्ये दाखल झाला आहे. यापूर्वी, २००९ मध्ये असा प्रकार घडला होता. २३ मे २००९ मध्ये मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता.
मान्सूनच्या लवकर आगमनाचा देशभरातील कृषी नियोजन आणि जलसंपत्ती व्यवस्थापनावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.
आयएमडीने आपल्या अपडेट्मध्ये म्हटले आहे की, “पूर्व मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या दक्षिण कोकण किनाऱ्यावरील कमी दाबाचा पट्टा गेल्या ३ तासांत ६ किमी प्रतितास वेगाने पूर्वेकडे सरकला आणि आज २४ मे २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता दक्षिण कोकण किनाऱ्याजवळील १७.२० उत्तर अक्षांश आणि ७३.२० पूर्व रेखांशावर, रत्नागिरीच्या वायव्य-वायव्येस सुमारे ३० किमी आणि दापोलीच्या ७० किमी दक्षिणेस केंद्रस्थानी होता. तो जवळजवळ पूर्वेकडे सरकत राहण्याची आणि आज २४ मे २०२५ रोजी दुपारपर्यंत रत्नागिरी आणि दापोली दरम्यान कमी दाबाच्या पट्ट्या म्हणून दक्षिण कोकण किनाऱ्याला ओलांडण्याची शक्यता आहे.