पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेने मालतारणावरील मूल्यांकनात १०० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल ३६०० रुपये मूल्यांकन गृहीत धरीत शिखर बँकेने साखर कारखान्यांशी आर्थिक व्यवहार सुरू ठेवले आहेत. मूल्यांकनात वाढ झाली असली तरी कमाल उचलदर प्रतिक्विंटल ३२४० रुपये ठेवण्यात आला आहे. सुधारित मूल्यांकनामुळे कारखान्यांकडे शिल्लक असलेल्या हंगाम २०२४- २५ मधील उत्पादित साखरेपैकी विक्रीयोग्य अवस्थेतील साखरेवर जादा उचल दिली जात आहे. खुल्या बाजारातील साखर दरात झालेली वाढ विचारात घेत ही मूल्यांकन वाढ झाली आहे.
ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शिखर बँकेने मूल्यांकन दर वाढवताना मालतारणावरील उपलब्ध रकमेतून कारखान्यांकडील अपुरा दुरावा प्रथम वसूल करण्याचे धोरण कायम ठेवले आहे. अपुरा दुरावा, त्यानंतर थकित व्याज, अल्पमुदत कर्ज तसेच मध्यम मुदत कर्जाचे चालू हंगामातील देय हप्ते वसुली करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना बँकेने दिल्या आहेत. अर्थात, या सर्व वसुलीनंतर उपलब्धता शिल्लक राहिल्यास सदर निधी कारखान्याला एफआरपी वाटपासाठी दिला जात आहे. इतर कोणत्याही कारणासाठी रक्कम उपलब्ध करून देता येणार नाही, असेही शिखर बँकेने स्पष्ट केले आहे. जादा मूल्यांकनातून उपलब्ध होणारी रक्कम बँकेच्या वसुलीनंतर केवळ एफआरपी अदा करण्यासाठीच वापरता येईल, असे बंधन शिखर बँकेने राज्यातील कर्जदार साखर कारखान्यांवर टाकले आहे. शासनाने घोषित केलेल्या एफआरपीइकतीच रक्कम ऊस उत्पादकांना अदा करणे आवश्यक राहील, असेदेखील बंधन साखर कारखान्यांवर टाकण्यात आले आहे.