गांधीनगर : डेअरी क्षेत्रातील दिग्गज अमूलला मठ्ठ्यापासून बायोइथेनॉल तयार करण्याच्या मोठ्या प्रमाणात केलेल्या चाचण्यांमध्ये त्यांनी यश मिळवले आहे. चीज आणि पनीर बनवताना दुधातून उरलेला मठ्ठा (whey)हा एक घटक आहे. आतापर्यंत, भारतात इथेनॉल प्रामुख्याने उसाचा रस, काकवी, मका आणि खराब झालेले अन्नधान्य यांसारख्या स्रोतांपासून बनवले जात आहे. परंतु या नवीन प्रक्रियेच्या यशानंतर, भारतातील सर्वात मोठी दुग्ध सहकारी संस्था अमूलने बायोइथेनॉल प्लांटमध्ये ७० कोटी रुपये गुंतवण्याची योजना आखली आहे. प्रस्तावित प्लांटमधून दररोज ५०,००० लिटर बायोइथेनॉलचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.
याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमूल ब्रँडचे मार्केटिंग करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) चे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी सांगितले की, आम्ही पनीर / चीज व्हेपासून बायोइथेनॉल उत्पादनाची विस्तृत चाचणी केली. आमच्या ३६ लाख शेतकरी-मालकांसाठी एक नवीन उत्पन्न स्रोत निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ४.५ लाख लिटर पनीर व्हे (whey / मठ्ठा) वापरून, चाचणीत २०,००० लिटर रेक्टिफाइड स्पिरिट मिळाले, ज्यामध्ये ९६.७१% इथेनॉलचे प्रमाण होते. मेहता यांच्या मते, ४.४ टक्के हा उतारा भविष्यात ८ टक्क्यापर्यंत वाढवता येईल.
मेहता म्हणाले की, या प्रक्रियेतून मिथेन वायू, कोरडा बर्फ आणि पाणी यासारखे उपयुक्त उप-उत्पादने तयार होतात. या चाचणीमागील कल्पना सरकारच्या इथेनॉल-ब्लेंडेड पेट्रोल (EBP) कार्यक्रमाला पाठिंबा देणे होती. त्याचा उद्देश पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यापर्यंत वाढवणे आहे. हा पथदर्शी प्रकल्प भरुच जिल्ह्यातील श्री नर्मदा खंड उद्योग सहकारी मंडळी लिमिटेडच्या धारीखेडा साखर कारखान्याच्या युनिटमध्ये राबविण्यात आला. या युनिटचे व्यवस्थापन घनश्याम पटेल करतात. ते जीसीएमएमएफच्या सदस्य डेअरींपैकी एक असलेल्या भरूच डेअरीचे प्रमुखदेखील आहेत. अमूल सध्या दररोज सुमारे ३० लाख लिटर मठ्ठ्याची हाताळणी करते. गुजरातमध्ये, सहकारी संस्था खत्रज, पालनपूर आणि हिम्मतनगर येथे असलेले तीन प्रमुख चीज प्लांट चालवते, ज्यांचे संचालन अनुक्रमे अमूल डेअरी, बनास डेअरी आणि साबर डेअरी करतात. ते संपूर्ण भारतात १५ हून अधिक चीज उत्पादन सुविधा देतात.