सोलापूर: मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी दामाजी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर विश्वास ठेवत आम्हाला कारखान्याची सत्ता दिली. त्याच विश्वासाला पात्र राहून कारभार करून ऊस उत्पादक व वाहतूकदारांची बिले वेळ देण्याचे काम आम्ही केले. त्याच पद्धतीने विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा होती. मात्र, विरोधकांनी जाणून बुजून संस्थेची निवडणूक लावली. परंतु मतदानातून सभासदांनी संस्था चालण्यासाठी कोण सक्षम आहे याचे उत्तर मतपेटीतून दिले. भविष्यात सोसायटीचा कारभारदेखील दामाजी कारखान्याप्रमाणे करण्यासाठी लक्ष ठेवणार आहे. विकास सोसायटीचे सभासदत्वही खुले करणार आहे, अशी घोषणा दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केली.
तळसंगी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. अध्यक्षपदासाठी सतीश अवताडे यांना दुसऱ्यांदा तर उपाध्यक्षपदी महादेव बिचुकले यांची बिनरोध निवड झाली. त्यानंतर त्यांचा रामचंद्र सारवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवानंद पाटील म्हणाले, ज्यांना सभासद व्हायचे आहे त्यांना दामाजीप्रमाणे सभासदत्व खुले ठेवले आहे. नूतन संचालक दादा कोंडुभैरी, बलभीम पाटील, चिदानंद पाटील, किसन दोडके, यशवंत पाटील, धोंडीबा बिचुकले, भगवान दुधाळ, नानासो गायकवाड शिवाजी शिंदे, राजू पांढरे, अशोक खंडागळे यांसह राजू जामगोंडे रामभाऊ सारवडे, राजू कुंभार, दुधाळ, मेटकरी, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.