धाराशिव : सध्या धाराशिव, कळंब, केज, अंबाजोगाई, लातूर तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी ऊस पिकाला पावसाळी खताचे डोस देण्याचे नियोजन करत आहेत. हे करत असताना रासायनिक खत मातीआड न करता तसेच फेकून देणे, अनावश्यक खताचा वापर अशा अयोग्य नियोजनामुळे रासायनिक खताची कार्यक्षमता कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ऊस पिकाच्या पावसाळी खत व्यवस्थापनासाठी योग्य खताची निवड व खत वापराची योग्य पद्धत तसेच कीड रोग व्यवस्थापनाच्या योग्य उपाययोजना सुचवण्यासाठी नॅचरल शुगरतर्फे आयोजित डिजिटल शेतीशाळा वर्गाला शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या हेतूने नॅचरल शुगरचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक बी. बी. ठोंबरे, संचालक पांडुरंग आवाड, केन मॅनेजर मदन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेतीशाळा गुगल मिटवर घेण्यात आली. डिजिटल शेतीशाळा वर्गाच्या प्रास्ताविकात कृषीभूषण पांडुरंग आवाड यांनी कारखाना कार्यक्षेत्रात झालेली एकूण ऊस लागवड, डिजिटल शेतीशाळेचा उद्देश बाबत मार्गदर्शन केले.
कृषी सहाय्यक पंडित काकडे यांनी ऊस शेतीमधील शेतकऱ्यांच्या अडचणी बाबत ऊहापोह केला. ऊस विकास अधिकारी येळकर यांनी सद्यस्थितीत कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये निदर्शनास येत असलेले ऊस पिकावरील कीड रोग अन्नद्रव्य कमतरतेमुळे निर्माण झालेली विकृती यांची निरीक्षणे दाखवून त्याच्या व्यवस्थापनाच्या उपाययोजना सुचवल्या. त्याचबरोबर त्यांनी हुमणी व्यवस्थापनासाठी प्रकाश सापळे लावण्याचे आवाहन केले. कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापक डॉ. विनेश रेगे यांनी मातीमधून पावसाळी खत देण्यासाठी वापरावयाची पद्धती व खताचे विविध ग्रेड बाबत विस्तृतपणे माहिती दिली.
यारा इंटरनॅशनल फर्टीलायझर कंपनीचे ॲग्रोनॉमिस्ट रवींद्र घडवजे यांनी ऊस पिकाचे फवारणी व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून खत व्यवस्थापन, विविध खतांची सुसंगतता बाबत विस्तृतपणे मार्गदर्शन करून उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विस्तृतपणे दिली. नॅचरल शुगरचे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांनी ऊस पिकामध्ये संतुलित खतांचा वापर करण्यासाठी नॅचरल शुगर उत्पादित नॅचरल पोटॅश, नॅचरल ऑरगॅनिक फर्टीलायझर, फर्मेंटेड ऑरगॅनिक मॅन्युअर ही खते शेतकऱ्यांसाठी माफक दरात उपलब्ध केल्याबाबत तसेच ऊस पिकासाठी ठिबक सिंचनचा अवलंब करण्यासाठी कारखान्याच्या ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी या ऑनलाईन कार्यशाळेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
… असे करा ऊसातील चाबुक काणी, गवताळ वाढ, कांडी कीड व्यवस्थापन
* चाबुक काणी प्रादुर्भावग्रस्त उसाचे फुटवे विळ्याने कापून घेऊन त्याची काजळी शेतामध्ये पडू न देता व्यवस्थित प्लास्टिकच्या पोत्यात भरून शेता बाहेर नेऊन जाळून टाकावेत त्यानंतर जमिनीखाली राहिलेले उसाचे बेट इतर अवशेष काढून नष्ट करावेत यामुळे रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल.
* चाबुक काणी रोगाच्या प्रादुर्भाव व्यवस्थापनासाठी ॲझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के अधिक डायफेनोकोनाझोल ११.४ टक्के एससी या संयुक्त बुरशीनाशकाची १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
* गवताळ वाढीची बेटे आढळल्यास ती मुळासकट काढून जाळून नष्ट करावीत.
* फुले २६५ ऊस जातीच्या संकरातून तयार झालेल्या ऊस जातीमध्ये तांबेरा, पानांवरील तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगांच्या व्यवस्थापनासाठी ३ ग्रॅम मॅन्कोझेब प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
* ऊस पिकातील कांडी कीड व्यवस्थापनासाठी क्लोरअँट्रानिलीप्रोल (०.४ टक्का) हे दाणेदार कीटकनाशक हेक्टरी १८.७५ किलो याप्रमाणे पावसाळी खतासोबत पेरून द्यावे.
– शिवप्रसाद येळकर (ऊस विकास अधिकारी, नॅचरल शुगर, रांजणी)