सोलापूर : उसाच्या रसापासून बनविलेल्या आईस्क्रीमला ग्राहकांचा मिळतोय चांगला प्रतिसाद

सोलापूर : येथील मार्कंडेय रुग्णालयासमोर दिव्या हरिदास पेंटा यांनी उसाच्या रसाचे चविष्ट आईस्क्रीम बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्या नैसर्गिक पद्धतीने मशीनवर उसाचा ताजा रस, बीटरूटचा रस आणि उसाचे खास आईस्क्रीम तयार करतात. सोलापूरमध्ये उसाच्या रसाचे आईस्क्रीम देणाऱ्या त्या पहिल्या व्यावसायिक ठरल्या आहेत. हा आरोग्यदायी पर्याय नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. सासरे वयस्कर असूनही व्यवसायात शक्य तितकी मदत करतात. सासूबाई मुलांची देखभाल करतात. पती पुण्यात नोकरीला असूनही प्रत्येक शनिवार आणि रविवार सोलापूरला येऊन मदत करतात. या सर्वांच्या सहकार्यामुळेच मला हा व्यवसाय यशस्वीरित्या चालवता येतो असे दिव्या यांनी सांगितले.

दिव्या यांनी पतीच्या मदतीने ५ लाख रुपयांची गुंतवणूक सोलापुरात फेब्रुवारी महिन्यात ‘आरजीएम’ हेल्दी ड्रिंकची सुरवात केली. आज याच व्यवसायातून त्या गेली तीन महिने चांगल्या प्रकारे उलाढाल करत आहेत. दिव्या, पती, दोन मुले, सासू-सासरे असा त्यांचा परिवार आहे. पती पुण्यामध्ये कंपनीमध्ये काम करत असल्याने त्यांच्या या व्यवसायात त्यांचे सासरे मदत करतात. दिव्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाने अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा दिली आहे. दिव्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात अशी तिच्या पालकांची इच्छा होती. त्यामुळे पतीच्या मदतीने त्यांनी हार न मानता पुन्हा पायावर उभं राहण्याचं स्वप्न पाहून व्यवसायाला सुरवात केली आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here