सातारा : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भेट दिली. या केंद्रासाठी नवीन प्रशासकीय इमारत, शेतकरी निवास व प्रशिक्षण केंद्र, कर्मचारी निवासस्थान, टिशू कल्चर प्रयोगशाळा, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रक्षेत्र कार्यालय उभारणीस तत्वतः मान्यता देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, प्रगतशील शेतकरी दिलीप शिंदे, मधुकर कोकाटे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, सरपंच राहुल कोकरे आदी उपस्थित होते.
मंत्री कोकाटे यांनी केंद्रातील शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्याशी संवाद साधला. या केंद्राने कमी कालावधीचे व अधिक साखर उतारा देणारे ऊस वाण विकसित करावे, ऊस पिकात एआयचा वापर करून लागवड खर्च कमी करण्यासाठी व उत्पादन वाढवण्यासाठी संशोधन करावे. यांत्रिकीकरणावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाचे अभियंता मिलिंद डोके यांनी केंद्राच्या प्रस्तावित इमारतीचा आराखडा सादर केला. केंद्राचे प्रमुख राजेंद्र भिलारे यांनी स्वागत केले. केंद्रांने विकसित केलेल्या उसाच्या वाणाखाली देशात ५६ टक्के व राज्यात ८७ टक्के क्षेत्र असल्याचा उल्लेख त्यांनी केला. शेतकरी गिरीश बनकर, सौरभ कोकीळ, कल्याण काटे यांची भाषणे झाली.