पुणे : यशवंत साखर कारखान्याच्या जागा खरेदी प्रस्तावास पणन संचालकांचा हिरवा झेंडा, जमीन खरेदीसाठी २९९ कोटी रुपये निश्चित

पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची सुमारे ९९.२७ एकर जमीन २९९ कोटी रुपयांना खरेदी करण्यासाठीच्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रस्तावास पणन संचालकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील कलम १२ (१) अन्वये हिरवा झेंडा दाखविला आहे. असे असले तरी याबाबतच्या अंतिम निर्णयासाठीचा प्रस्ताव सहकार व पणन विभागाच्या प्रधान सचिवांकडे पणन संचालनालयाने पाठविला कॅबिनेटच्या बैठकीमध्येच जागा खरेदीवर शिक्कामोर्तब करण्याच्या हालचाली आहे. त्यावर आता मंत्रालयस्तरावर कॅबिनेटच्या बैठकीतच शिक्कामोर्तच होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून ‘पुढारी’ला सांगण्यात आले.

दरम्यान, यशवंत कारखान्यावरील एकूण थकीत देणी रक्कम ही एकरकमी कर्ज परतफेडीद्वारे कमी करून कारखाना सुरू करण्यास संचालक मंडळाने प्राधान्य दिल्याचेही सांगण्यात आले. त्याहष्टीने ‘यशवंत’च्या जमीन खरेदीचा विषय दोन्ही संस्थांकडून पत्रव्यवहार होऊन मूर्त स्वरूपात आलेला आहे. मौजे थेऊर येथील यशवंत कारखान्याची एकूण ९९.२७ एकर जमिनी खरेदी विक्री करण्यास थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना व पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळाच्या संयुक्त सभा २८ मार्च २०२५ रोजी झाली. त्यामध्ये निश्चित केलेली रक्कम रुपये २९९ कोटी देणे घेणेकामी दोन्ही संस्थांनी करावयाची कार्यवाही पणन विभागाने शासनास सादर केलेल्या पत्रव्यवहारात नमूद केल्याचे सांगण्यात आले. बँकेच्या थकीत कर्जाची ओटीएस रक्कम देण्याबाबत, सात-बारा उताऱ्यावरील बोजा नोंदी कमी करणे, शासकीय देणी देणे आदी बाबींचा समावेश असल्याचे समजते. त्यामुळे ‘पणन’च्या प्रस्तावावर शासनस्तरावर त्रुटी न काढळल्यास लवकरच कॅबिनेटच्या बैठकीत जागा खरेदीवर शिक्कामोर्तब होऊ शकते, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समिती अशी करणार निधीची उभारणी …

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सध्या १४१ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. दैनंदिन प्रशासकीय खर्च व पायाभूत सुविधांसाठीच्या खर्चाची रक्कम ठेवून प्रत्यक्षात जागा खरेदीस १०० कोटी रुपये उपलब्ध होतील, नवीन फुलबाजारातील गाळे बांधकाम पूर्णत्वास गेले आहेत. त्यातून पुढील सहा महिन्यांत ३० वर्षाच्या भाडेपट्ट्याने गाळे वितरणातून समितीस ६५ ते ७० कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतात तसेच समितीच्या मालकीची मौजे कोरेगाव मूळ येथील १२ एकर जागेच्या शासन मंजुरीद्वारे विक्रीतूनही समितीस ६५ ते ७० कोटी रुपये उपलब्ध होतील. त्यानुसार टप्प्याटप्याने रक्कम उपलब्ध होऊन त्यानुसार कारखान्यासह ही रक्कम देण्याची तयारी समितीने दर्शविल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here