पुणे : विघ्नहर साखर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर, कारखाना सेंद्रिय खत उपलब्ध करून देणार

पुणे : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने २०२६-२७ गळीत हंगामासाठी पुरेसा ऊस उपलब्ध व्हावा यासाठी लागवड हंगाम २०२५-२६ मधील ऊस लागवड धोरण एक जूनपासून राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना ऊस पिकातील नवनवीन संशोधित तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाच्या वापराची माहिती होण्यासाठी कारखाना खर्चाने ‘व्हीएसआय’च्या ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पाठविले जाते. ऊस उत्पादकांनी ऊस विकास योजनांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे नोंद करून गाळपास द्यावा.

अध्यक्ष शेरेकर म्हणाले की, चालू लागवड हंगामापासून विघ्नहर कृषी अमृत फर्मेंटेड सेंद्रिय खत उधारीने वसुली तत्त्वावर माफक दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. कारखान्यामार्फत लागवड हंगाम २००३-०४ पासून हुमणी किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी व मजुरांकडून रोख रक्कम प्रतिकिलो २०० रुपयांप्रमाणे हुमणी किडीचे भुंगेरे गोळा करून नष्ट केले जातात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड हंगाम २५-२६ मध्ये ता. २६ मे ते ३० जून २०२५ या कालावधीत हुमणी किडीचे भुंगेरे गोळा करून कारखाना गट ऑफिसला जमा करावेत. नोंद झाल्यानंतर प्रतिएकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रत्यक्ष बांधावर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. शेतकऱ्यांना जिवाणू खतांचा तसेच हिरवळीचे खतासाठी ताग बियाण्यांचा पुरवठा केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here