पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून कार्यक्षेत्रात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. याबाबत अनेक चर्चा घडल्या, अनेक पर्याय अनेक नावांसह समोर आले तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये युती झाल्याच्या चर्चेला अति उधाण आले. तथापि या फक्त चर्चाच होत्या तर काही लोकांची यामधून करमणूक होत होती. आता मात्र चर्चेला पूर्णविराम देण्याचा दिवस उजाडला असून गुरुवारी (दि. १२) कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा अंतिम दिवस असल्याने कुणाचे आणि किती पॅनेल होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर पारंपरिक विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्ताधारी अजित पवार आणि चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरू-शिष्याच्या जोडीने आपापल्या परीने संभाव्य उमेदवारांसह प्रचारात गाव बैठका तसेच घोंगडी बैठका घेत रंगत आणली आहे. तथापि दोन्ही गटाच्या प्रमुखांनी अद्याप पॅनेलमधील उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत. त्यामुळे कोणत्या पॅनेलमध्ये कोणाला संधी मिळणार? कुणाचा पत्ता कट होणार? याबाबत चर्चांना उधाण आले. त्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडत गेल्या. या निवडणुकीत व वर्ग गटातून राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः अजित पवार यांनी अर्ज भरल्याने निवडणुकीत वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. गुरुवारी १२ तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. अशावेळी आजच्या १२ तारखेला कोणत्या पॅनेलमधून कुणाला उमेदवारी मिळणार? तर कुणाचा पत्ता कट होणार? म्हणजेच कोणाचे १२ वाजणार तर कुणाचे तीन तेरा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.