पुणे : माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी (दि. १४) दुपारी ३.३० वाजता ओम साई मंगल कार्यालयात होणार आहे. यावेळी अजित पवार काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
दरम्यान, गुरुवारी (दि. १२) सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ कार्यक्षेत्रातील निरा वागज येथील जाहीर सभेने सुरू झाला. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत चिन्हवाटप झाल्यानंतर एकूण ९० उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र आहे. यामध्ये अजित पवार गटाच्या श्री नीलकंठेश्वर पॅनेल, तावरे गुरू-शिष्यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बळीराजा सहकार बचाव पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी पॅनेल अशा एकूण चार पॅनेलच्या उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.