सांगली : उदगिरी साखर कारखान्याकडे सन २०२५-२६ गळीत हंगामासाठी आतापर्यंत ९,५०० हेक्टर उसाची नोंद झाली आहे. कारखान्याने या गळीत हंगामामध्ये एकूण ७ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक चंद्रकांत गव्हाणे यांनी दिली. आगामी गळीत हंगामासाठी मशिनरी दुरुस्ती व देखभाल कामे प्रगतिपथावर आहेत. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे नोंद करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन गुरुवारी संचालक गव्हाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी गव्हाण यांनी सांगितले की, ऊस तोडणी व वाहतुकीचे करार सुरू असून ३३० मोठी वाहने (ट्रॅक्टर, ट्रक), ३०० ट्रॅक्टर गाडी (अंगद) व १५ हंगामी करार झालेले असून त्यांना ॲडव्हान्स (अग्रीम ) वाटपही सुरू केले आहे. कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष डॉ. राहुल कदम यांच्या कुशल प्रशासनाखाली या कारखान्याच्या गळीत हंगाम २०२५-२६ चे नियोजन सुरू आहे. सर्व कामे वेळेत पूर्ण होऊन येणारा गळीत हंगाम वेळेत व पूर्ण क्षमतेने सुरू होईल.