अहिल्यानगर : कोपरगाव तालुक्यातील वडगाव – बक्तरपूर येथे आडसाली ऊस पिक व कीड नियंत्रणाबाबत परिसंवाद व चर्चा सत्र मोठ्या उत्साहात झाले. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव चव्हाण होते. वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे ऊस उत्पादन व संरक्षक विभागाचे प्रमुख संशोधक डॉ. अशोक कडलग व रोग शास्त्र विभागाचे प्रमुख संशोधक डॉ. गणेश कोटगिरे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्यावतीने सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगण्यात आले.
ऊस पिक परिसंवादात डॉ. अशोक कडलग म्हणाले की, ऊस पिकाची लागवड करताना शेतकऱ्यांनी योग्य जमिनीची निवड करून सेंद्रिय कर्ब वाढवावे. खतांचा संतुलित वापर करावा. क्षारयुक्त जमिनीची सुधारणा करून पाण्याचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त ऊस उत्पादन घ्यावे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचेदेखील मार्गदर्शन घ्यावे. डॉ. गणेश कोटगिरे यांनी सांगितले की, भविष्यात ऊस पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यासाठी संध्याकाळच्या वेळी हुमणीचे भुंगे जमा करून नष्ट करावेत. कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आडसाली ऊसाच्या लागवडीतून एकरी ६० ते ७० टन उत्पन्न मिळते. आडसाली ऊस कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होताच तोडला जातो असे ते म्हणाले. संचालक श्रीराम राजेभोसले, सचिन चांदगुडे, सुनील मांजरे, माजी संचालक कचरू घुमरे, शेती अधिकारी निळकंठ शिंदे आदी उपस्थित होते. आण्णासाहेब चिने यांनी सूत्रसंचालन केले. निळकंठ शिंदे यांनी आभार मानले.