अहिल्यानगर : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने यावर्षी सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी ही माहिती दिली. गुरुवारी कारखान्याच्या मिल रोलरच्या पूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपाध्यक्ष रामकिसन काकडे, ज्येष्ठ संचालक उद्धवराव वाघ, राहुल राजळे, डॉ. यशवंत गवळी आदी उपस्थित होते. यावेळी हंगामपूर्व कामाचा आढावा घेण्यात आला.
अध्यक्ष राजळे म्हणाले की, साखर कारखान्यामध्ये हंगामपूर्व मशिनरी देखभाल दुरुस्तीची कामे प्रगतिपथावर आहेत. ऊस तोडणीसह वाहतूक यंत्रणा कार्यन्वित करण्याच्या सूचना शेती विभागाला दिल्या असून निर्धारित वेळेतच ऊस गाळपाला सुरुवात होईल. सहकारी साखर उद्योग ही एक कौटुंबिक चळवळ आहे. साखर कामगार, ऊस उत्पादक शेतकरी सभासद हा या व्यवस्थेचा कणा आहे. ती टिकविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. यावेळी राहुल राजळे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत मिसाळ यांनी आभार मानले. कुशीनाथ बर्डे, कोंडीराम नरोटे, शेषराव ढाकणे, काकासाहेब शिंदे, बाळासाहेब गोल्हार, बाबासाहेब किलबिले, अनिल फलके, नारायण काकडे, शरद अकोलकर आदी उपस्थित होते.