पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. २२) सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान मतदान होत आहे. माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये एकूण चार पॅनेल तसेच अपक्ष उमेदवारांसह एकूण ९० उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निळकंठेश्वर पॅनेल, चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बळीराजा सहकार बचाव पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समितीचा पॅनेल व इतर अपक्ष अशी लढत असेल.
निवडणुकीसाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून ६७ मतदान केंद्र निश्चित केली आहेत. कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्ग गटातून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणूक लढवत आहेत. पोलिस प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी संपूर्ण तयारी केल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. गट नंबर १ माळेगावसाठी ११ मतदान केंद्रे आहेत. गट नंबर दोन पणदरेसाठी १३ मतदान केंद्रे, गट नंबर ३ सांगवी-कांबळेश्वरसाठी ८ मतदान केंद्रे, गट नंबर ४ खांडज- शिरवलीसाठी ७ मतदान केंद्रे, गट नंबर ५ निरावागजसाठी १२ तर गट नंबर ६ बारामतीसाठी १५ मतदान केंद्रे आहेत. ‘ब’ वर्गातील १०२ मतदारांसाठी एकच मतदान केंद्र आहे.