सातारा : कापशी (ता. फलटण) येथील शरयू ॲग्रो साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक अविनाश भापकर, युनिट हेड विजय जगदाळे, व्यवस्थापक विनायक जाधव उपस्थित होते. शरयू उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस गाळप हंगामामध्ये दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे असे संचालक अविनाश भापकर यांनी सांगितले. कारखान्याने मागील हंगामातील ऊस बिले सर्वोत्तम दर देऊन एकरकमी वेळेत अदा केली आहे आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी कारखान्याकडे उत्स्फूर्त ऊस नोंदी केल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
संचालक भापकर यांनी सांगितले की, कारखान्याची सक्षम तोडणी व वाहतूक यंत्रणेची करार प्रक्रिया कारखाना कार्यस्थळावर चालू आहे. परिसरातील स्थानिक ऊस वाहतूकदारांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर काळाची गरज असून, परिसरातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्यासाठी हे तंत्रज्ञान अवगत करून प्रगतशील ऊस शेती करण्याचे आवाहन जगदाळे यांनी केले. मिल रोलर पूजनप्रसंगी कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.