रावळपिंडी : पाकिस्तानमध्ये सध्या अनागोंदीचे वातावरण आहे. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तू असलेल्या साखरेचे दर सातत्याने वाढत असल्याने लोक, व्यापारी हैराण झाले आहेत. सेंट्रल ग्रोसरी मर्चंट्स असोसिएशनने साखरेच्या वाढत्या संकटाबद्दल सरकारला निषेध पत्र पाठवले आहे. सरकारच्या किंमत धोरणांवर यात टीका करण्यात आली आहे. तसेच घाऊक किमतींमध्ये अशीच अनियंत्रित वाढ सुरू राहिल्यास साखर विक्री थांबवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत असोसिएशनचे सरचिटणीस रिझवान शौकत आणि संरक्षक सलीम परवेझ बट म्हणाले की, घाऊक बाजारात ५० किलो साखरेच्या पोत्याची किंमत दररोज १०० रुपयांनी वाढत आहे. घाऊक बाजारात साखर आता १७४-१७७ रुपये प्रतीकिलोने विकली जात आहे आणि किरकोळ बाजारात ती १९० रुपये किलोवर पोहोचली आहे. जर दर वाढत राहिले तर साखर लवकरच २०० रुपये किलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा अधिकारी किरकोळ विक्रेत्यांवर साखर १६४ रुपये प्रति किलोने विकण्यासाठी दबाव आणत आहेत. असोसिएशनच्या मते ही मागणी अव्यवहार्य आहे. घाऊक साखरेचा दर १७७ रुपये किलो आहे. याशिवाय, साखरेची वाहतूक, लोडिंग-अनलोडिंग आणि पॅकेजिंगचा अतिरिक्त खर्च १३ रुपये प्रति किलो आहे.