सांगली : क्रांती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या लावण हंगामामध्ये प्लास्टिक ट्रे मधील एक कोटी रोपे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात यातील पहिल्या टप्प्यात तयार झालेल्या रोपांच्या विक्रीचा प्रारंभ झाला. कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधुनिक व शाश्वत शेतीची दिशा दाखवणाऱ्या ‘प्लास्टिक ट्रेमधील ऊस रोपांची निर्मिती’ ही आधुनिक पद्धत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, संचालक दिलीप थोरबोले, संग्राम जाधव, अनिल पवार, विजय पाटील, संजय पवार, वैभव पवार, सुभाष वडेर, माजी संचालक कुंडलिक थोरात, संदीप पवार, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे उपस्थित होते.
कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड म्हणाले की, शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे, कमी पाणी वापर आणि अधिक उत्पादन देण्यास मदत करेल. तसेच या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा विकास व ऊस शेतीतील क्रांती निश्चितच घडेल. तर ऊस विकास अधिकारी विलास जाधव म्हणाले की, ऊस लावणीमध्ये कांडीपेक्षा रोप पद्धतीने लावण केल्याचे विविध लाभ आहेत. हवामानाच्या लहरीपणामुळे उसाची समाधानकारक उगवण होईल, याची खात्री नसते. ऊस रोपे वापरल्याने पाणी व जमीन यांचा कार्यक्षम वापर होतो. याशिवाय एकरी सहा ते सात टन उत्पादनात वाढ होते. त्यामुळे अधिक शेतकऱ्यांनी ऊस शेतीत रोपांचा वापर करावा.