पाटणा : बिहारच्या साखर उद्योगाचा नावलौकिक लवकरच जगभर पसरण्याची शक्यता आहे. कारण बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात भारतातील पहिले आणि जगातील पाचवे आंतरराष्ट्रीय ऊस संशोधन केंद्र सुरु होणार आहे. पुसा येथील डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या ऊस संशोधन केंद्राने या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल ऊस उद्योग विभागाला सादर केला आहे. गेल्या काही वर्षांपासून बिहार सरकारने साखर उद्योगाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. यासोबतच इथेनॉल उत्पादनालाही प्रोत्साहन दिले जात आहे. पुढील काही वर्षांत राज्य इथेनॉल उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
नियोजित ऊस संशोधन केंद्राला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्याची तयारीही सुरू आहे. या केंद्रातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान, उच्च दर्जाचे बियाणे आणि नवीनतम संशोधनाची माहिती मिळेल. या प्रकल्पाबाबतची पहिली बैठकही विभागीय पातळीवर पूर्ण झाली आहे. येथे जागतिक दर्जाचे संशोधन केले जाईल आणि जगभरातील शेतकरी प्रशिक्षणासाठी येथे येतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर, आतापर्यंत फक्त चार देशांमध्ये ऊस संशोधनासाठी अशी केंद्रे आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेची एसएएसआरआय, चीनची ग्वांगशी ऊस उद्योग संशोधन संस्था, टांझानियाची किबाहा ऊस संशोधन संस्था आणि बांगलादेशातील इशुर्डी येथील ऊस संशोधन संस्था यांचा समावेश आहे. अशा स्थितीत बिहारचे समस्तीपूर (पुसा) हे जगातील पाचवे आंतरराष्ट्रीय ऊस संशोधन केंद्र असेल.