बीड : सोळंके साखर कारखान्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. आगामी काळामध्ये विविध उपपदार्थ निर्मीती प्रकल्पाबरोबरच शेतकऱ्यांना उस उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. उस उत्पादक शेतकऱ्यांना उस उत्पन्न वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे, असे मत सोळंके कारखान्याचे अध्यक्ष विरेंद्र प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केले.
नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी राज्यातील २५ साखर कारखाना अध्यक्षांकरीता ब्राझील येथे उस पिक अभ्यास दौऱ्यांचे आयोजन केले होते. ब्राझील येथून आल्यानंतर बोलतांना विरेंद्र सोळंके यांनी ब्राझीलच्या साखर उद्योगाची माहिती दिली. अध्यक्ष सोळंके म्हणाले की, ब्राझीलमध्ये असलेली उसशेती ही संपूर्णतः यांत्रिक पद्धतीने केली जाते. तेथे उस यंत्राद्वारे कापला जातो. साखर कारखान्यांमध्ये साखर व इथेनॉलमध्ये प्रक्रिया केली जाते. यांत्रिक शेतीचा वापर केला जातो. ब्राझीलमध्ये उसाचे सर्वाधिक ६० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन देणारे साओ पाउलो हे राज्य आहे. जगातील सर्वात मोठा इथेनॉल निर्यातदार ब्राझील आहे. तेथील मुख्य पिके उस, सोयाबीन, मका ही आहेत. ब्राझीलच्या या दौऱ्यामुळे आपल्या राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना शेतामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.