पुणे : सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांचा आडसाली हंगामावर भर, दोन कोटी रोप लागवडीची नोंद

पुणे : सोमेश्वर कारखान्याच्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा रोप लागवडीकडे कल वाढला आहे. गतवर्षी दोन महिन्यांच्या आडसाली हंगामात साठ लाख रोपांची लागवड झाली होती. चालू लागवड हंगामापूर्वी सततच्या पावसाने लागवडीस अनंत अडथळे आले. तरीही शेतकरी पट्टा पद्धतीच्या आधुनिक रोप लागवडीकडे वळला आहे. जवळपास पन्नास टक्के लागवड रोपांचीच होईल, असे स्पष्ट झाले. आडसाली हंगामाच्या पहिल्याच दिवशी, मंगळवारी तब्बल ३६०० एकर म्हणजेच दोन कोटी रोपांची लागवड झाल्याचे स्पष्ट झाले. काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी घरीच कमी खर्चात रोपे तयार केली आहेत.

यंदा पावसाने लागवड कमी होईल, असा अंदाज होता. मात्र शेतकऱ्यांनी एक जुलै रोजी तब्बल ७८०० एकरातील ऊस लागवडीची नोंद झाली. त्यापैकी ४६ टक्के म्हणजे ३६१९ एकर क्षेत्रावर रोप लागवड आहे. कारखान्याकडे साठ लाख रोपांचे नोंदणी झाली आहे. शेतकऱ्यांनी स्वतः कोल्हापूर, सांगलीहून दर्जेदार रोपे मागविली. त्यामुळे पहिल्याच दिवशी दोन कोटी रोप लागवड झाली आहे. सोमेश्वर कारखान्याने आडसाली लागवडीसाठी एक जुलैपासून परवानगी दिली. ऊस वेळेत तुटावा म्हणून पहिल्या दिवशी अधिकाधिक लागवडीची शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा असते. या रोप लागवडीमुळे ऊस उत्पादनात पंधरा टक्के वाढ होईल असा अंदाज आहे. कारखान्याने फुले २६५ चे रोप दोन रुपये ७० पैसे तर को ८६०३२ चे रोप दो रुपये ५० पैशांना उपलब्ध करून दिले आहे. एक रुपया आगाऊ भरून रोप दिले जाते. उर्वरित रक्कम देय रकमेतून वसूल केली जाते, अशी माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव व शेती अधिकारी बापूराव गायकवाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here