धाराशिव : जागजी येथील एनव्हीपी शुगरच्या द्वितीय गळीत हंगामासाठी मिल रोलरपूजन सोमवारी (ता. ३०) कारखान्याचे मार्गदर्शक आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एनव्हीपी शुगरच्यावतीने आगामी गळीत हंगामात दीड लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी दिली. ते म्हणाले, की गेल्यावर्षी प्रथम गळीत हंगाम घेण्यात आला होता. यामध्ये पूर्ण क्षमतेने एक लाख दोन हजार टन ऊस गाळप करण्यात आले. त्यावेळी हंगामातील ऊस बिल, तोडणी वाहतूक बिल रक्कम दिलेल्या शब्दाप्रमाणे सर्व अदा करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस चांगला होण्यास सुरू झाली असल्याने किंबहुना शेतकऱ्यांनीही यंदा ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. या हंगामात पूर्ण क्षमतेने कारखाना चालवून एक लाख ५० हजार टन ऊस गाळप करण्यात येईल.
दरम्यान, आगामी गळीत हंगामासाठी तोडणी- वाहतुकीचे करार पूर्ण करून ठेकेदारांना पहिला हप्ता देण्यात आला असून, गळीत हंगाम वेळेत सुरू करण्यात येणार आहे. यंत्रसामग्री दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात असून, कारखाना निर्धारित वेळेत ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे असे सांगण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक कृष्णा पाटील, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, चीफ इंजिनिअर ओंकार मोकाशे, चीफ केमिस्ट उमेश बिक्कड, इलेक्ट्रिक इंजिनिअर प्रवीण यादव, विजय वाघे, प्रवीण पाटील, अजय गाडे, लेबर ऑफिसर दत्तात्रय गायकवाड, सुधाकर खोत, रवी जोगदंड, सागर शिंदे, कैलास धाबेकर, संभाजी चोरमले, प्रज्योत माने, राजाभाऊ केवळराम आदी उपस्थित होते.