नवी दिल्ली : देशातील २६० सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (NFCSF) या शिखर संस्थेने दरवर्षीप्रमाणे देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाच्या २०२३-२४ वर्षीच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशभरातून १०३ सहकारी साखर कारखान्यांनी भाग घेतला. एकूण २५ पारितोषिकात महाराष्ट्राने एकूण १० पारितोषिके मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरील तमिळनाडूला पाच पारितोषिके प्राप्त झाली आहेत. उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर असून त्याला चार पारितोषिके मिळाली तर चौथ्या क्रमांकावरील गुजरातने तीन पारितोषिके प्राप्त केली. पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांना प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले आहे.
या पारितोषिकांचा वितरण समारंभ ३ जुलै रोजी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे होईल. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री निमूबेन बांभनिया, हरियाणातील ऋषीहूड विद्यापीठाचे कुलपती सुरेश प्रभू यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर विशेष अतिथी म्हणून हरियाणाचे सहकार मंत्री अरविंद कुमार शर्मा, कर्नाटकचे ऊस मंत्री शिवानंद पाटील, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी हे उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्याबरोबरच टेक्निकल सेमिनार व साखर उत्पादनाशी निगडित भव्य प्रदर्शन याच ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. टेक्निकल सेमिनार २ जुलै रोजी तर प्रदर्शन २ आणि ३ जुलै असे दोन दिवस खुले राहील. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उस शेतीमधील वापर या परिसंवाद, चर्चासत्राचे अध्यक्ष सिस्टंट डायरेक्टर जनरल (क्रॉप सायन्स) डॉ. प्रशांत कुमार दास, हे राहतील. या विषयावर बोलण्यासाठी मुख्य वक्ते म्हणून बारामती येथील कृषी विज्ञान ट्रस्टचे केंदाचे विश्वस्त प्रतापराव पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.