पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील अंतर्गत कामे प्रगतिपथावर असून, गतवर्षीप्रमाणेच हंगाम यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केला. कारखान्याचा रोलर पूजन समारंभ उपाध्यक्ष मिलिंद कांबळे व संचालक अभिजित काकडे यांच्या हस्ते व जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्या वेळी जगताप बोलत होते. या प्रसंगी कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे, सुनील भगत, शैलेश रासकर, बाळासाहेब कामथे, ऋषिकेश गायकवाड, किसन तांबे, अजय कदम, हरिभाऊ भोंडवे, तुषार माहुरकर, जितेंद्र निगडे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, वर्क्स मॅनेजर एन. एच. नायकोडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, येत्या हंगामासाठी तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार पूर्ण झाले आहेत. आजपर्यंत १ हजार १२० बैलगाडी, ६०० डंपिंग, २० ट्रक, ३७० ट्रॅक्टर, ३० हार्वेस्टरचे करार पूर्ण झाले असून, पहिल्या हत्याचेही वाटप केलेले आहे. आगामी हंगामासाठी शेतकी विभागाकडे ३५ हजार ५१२ एकर ऊस क्षेत्राची नोंद झाली असून, यात आडसाली १४ हजार ४९२ एकर, पूर्वहंगामी ७ हजार ९१६ एकर, सुरु ४ हजार १३२ एकर, खोडवा ८ हजार ९७२ एकर नोंद कारखान्याकडे झाली आहे. या नोंद झालेल्या क्षेत्रातून अंदाजे १२ ते १२.५० लाख मेट्रिक टन ऊस आपणास गाळपास उपलब्ध होईल. कारखान्याच्या शेतकी विभागाने हार्वेस्टरने ऊसतोड होण्याकरिता सभासद शेतकऱ्यांनी पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. नोंद झालेल्या क्षेत्रातून बारा ते साडेबारा लाख टन उसाचे गाळप वेळेत करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. सभासद, अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी वाहतूक यंत्रणा यांच्या सहकाऱ्याने येणारा हंगाम यशस्वी पार पाडू.