सातारा – एकरी ऊस उत्पादनवाढीसाठी पंचसूत्रीचा वापर आवश्यक : कृषिभूषण संजीव माने

सातारा : ‘जमिनीची सुपिकता, ऊस लागणीची योग्य पद्धत, रासायनिक खतांची मात्रा, पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पंचसूत्रीचा वापर एकरी ऊस उत्पादनवाढीसाठी करणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन कृषिभूषण संजीव माने यांनी केले. कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात दिवंगत वसंतराव नाईक जयंती व महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण, वृक्षदिंडी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक बाबासो. शिंदे होते.

संजीव माने म्हणाले, ‘ऊस शेतीकडे शाश्वत पीक आहे. जमिनीची सुपिकता हा ऊस शेतीमध्ये महत्त्वपूर्ण आहे. सेंद्रिय कर्ब कमी होत असताना शेण खत, हिरवळीचे खते, गांडूळ खताचा वापर करून सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. लागवडीपूर्वी माती परीक्षणानुसार खतांचा वापर, योग्य प्रमाणात शेण खत अथवा इतर सेंद्रिय खतांची मात्रा देत असतांना मुख्य, दुय्यम सूक्ष्म आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा. जास्त रासायनिक खते जास्त उत्पादन हा लोकांचा गैरसमज आहे. शास्त्रोक्त पद्धतीने ऊस शेती केल्यास एकरी १०० ते १२५ टन ऊस उत्पादन सहज शक्य आहे.

कार्यक्रमास संचालक बाजीराव निकम, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, व्यवस्थापकीय संचालक बाजीराव सुतार, कृष्णा विश्व विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, आंतरराष्ट्र व्यवहार विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, जनरल मॅनेजर (केन) दादासाहेब शेळके, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here