लातूर : प्रचंड आर्थिक अडचणींना तोंड देणारे लातूर जिल्ह्यातील हडोलती गावातील ७६ वर्षीय शेतकरी अंबादास पवार हे शेती करण्यासाठी बैल परवडत नसल्यामुळे बैलांएवजी स्वतःला नांगराला जुंपत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अंबादास पवार गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ शेती करत आहेत आणि गेल्या १० वर्षांपासून त्यांच्या पत्नी मुक्ताबाई अंबादास पवार यांच्या मदतीने नांगर ओढत आहेत, कारण जनावरांचा खर्च परवडत नसल्यामुळे त्यांना त्यांचे बैल विकावे लागले होते. त्यांनी सरकारकडे कर्ज माफ करावे, अशी विनंती केली आहे.
पवार म्हणाले कि, मी गेल्या ५० वर्षांपासून शेती करत आहे, पण बैलांचा खर्च उचलणे माझ्यासाठी शक्य नसल्याने, मी १० वर्षांपूर्वी बैल विकले आणि स्वतःच्या खांद्यावर नांगर ओढत आहे. कोणीतरी मला शेत नांगरताना पाहिले आणि व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आज लातूर जिल्हा अधिकारी आणि राज्यमंत्र्यांनी माझ्याशी संपर्क साधला,” असे अंबादास पवार यांनी सांगितले. लातूर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शिवसांब लडके यांनी पवार यांची भेट घेतली आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आणि सरकारी योजनांअंतर्गत त्यांना शेती साहित्य देण्याची ऑफर दिली. पवार यांनी सरकारकडे त्यांचे ४०,००० रुपयांचे थकित कर्ज माफ करण्याची मागणी केली आहे.
आम्ही संपूर्ण घरात ६ जण आहोत. मुलगा दुसऱ्या शहरात एका खाजगी कंपनीत काम करतो. त्याला आमच्याकडून काहीही मिळत नाही. आमच्याकडे ४.५ एकर जमीन आहे. आमच्याकडे बैल नाहीत, मी आणि नवरा हाताने शेत नांगरतो. जर सरकारने आम्हाला आमच्या पिकाला योग्य किंमत दिली असती तर आम्हाला हाताने नांगरणी करावी लागली नसती. तुम्ही पाहिले तर, सोयाबीन खताची किंमत प्रति पोती ३ हजार आहे आणि जर आम्हाला ते बाजारात विकावे लागले तर आम्हाला ४ हजार रुपये मिळतात. मग आमचा खर्च कसा भागवायचा हा आमच्यासमोर प्रश्न आहे,असे पत्नी मुक्ताबाई अंबादास पवार यांनी ‘एएनआय’ला सांगितले.