कोल्हापूर : जिल्ह्यात सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये सर्वाधिक ऊस दर ‘भोगावती’ने दिला असून, कारखान्यांचा कारभार पारदर्शक आहे. कोव्हिड-२०१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर केला होता. लॉकडाऊन कालावधीमध्ये अनेक व्यवसाय ठप्प झाले होते. साखर विक्री झाली नसल्यामुळे कारखान्याला अत्यावश्यक, वैधानिक देणी देणे अशक्य झाले होते. साखर कारखान्यांना आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी व आर्थिक तरलता उपलब्ध होण्यासाठी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना आत्मनिर्भर मध्यम मुदत कर्ज दिले. भोगावती कारखान्याला आत्मनिर्भर मध्यम मुदत कर्ज ७५.०० कोटी १२ टक्के व्याजदराने ६ वर्षे मुदतीसाठी मिळाले होते. त्याचा शेवटचा हप्ता येत्या जानेवारीत भरून त्या कर्जाची यशस्वी परतफेड करत आहोत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजेंद्र कवडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
या ७५ कोटीपैकी ऊस बिल ५ कोटी, पगार ४ कोटी, शासकीय देणी १ कोटी, देखभाल ४ कोटी, व्यापारी देणी १३ कोटी, ऊस वाहतूक तोडणीचे ४६ कोटी देण्यात आले होते. ही रक्कम जिल्हा बँकेतून दीर्घ मुदतीच्या कर्जरूपाने दिलेली होती. या रकमेचे त्या-त्या वेळी नाबार्ड, जिल्हा बँकेने लेखापरीक्षण केलेले आहे, अशीही माहिती अध्यक्ष पाटील यांनी दिली. गेल्या गळीत हंगामापूर्वी अती पाऊस झाल्याने राज्यातील ऊस उत्पादन घटलेले होते. त्याचा परिणाम भोगावती कारखान्यावरदेखील झालेला असताना आम्ही १२.७५ एवढा विक्रमी साखर उतारा मिळवत ५ लाख ३७ हजार ८७० क्विटल साखर उत्पादन केलेले होते. या गळीत हंगामात ४ लाख २१ हजार मे. टन गाळत केलेल्या उसाचे ३ हजार ३३४ रुपये प्रमाणे सर्व पैसे शेतकऱ्यांना दिलेले आहेत.
सभासदांनी ज्या विश्वासाने आमच्याकडे सत्ता सोपवली आहे. त्या विश्वासाला आम्ही पात्र आहोत. भोगावती कारखान्याची आर्थिक परिस्थिती गंभीर असली, तरी आम्ही संचालक मंडळ मंत्री हसन मुश्रीफ, राहुल पाटील-सडोलीकर, ए. वाय. पाटील, राजेश पाटील-सडोलीकर व अन्य नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करत आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेले या कारखान्याची यापूर्वी देखील सातत्याने बदनामी करणारी यंत्रणा काम करत आलेले आहे. यांना आम्ही कधीही भीक घालणार नाही, असाही इशारा पाटील यांनी यावेळी दिला. या बैठकीला ज्येष्ठ संचालक हिंदुराव चौगले, नंदुभाऊ पाटील, प्रा. ए. डी. चौगले, शिवाजी कारंडे, नीरज डोंगळे, रवी पाटील-तारळेकर, संचालक कार्यकारी संचालक संजय पाटील, उदय मोरे उपस्थित होते.