बेंगळुरू : कर्नाटकमध्ये म्हैसूर येथील म्हैसूर शूगर कंपनीमध्ये (मायशुगर) साखर उत्पादन सुरू न झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील अर्थकारणावर होत आहे, अशी तक्रार राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या रयत मोर्चाने केली आहे. यासंदर्भात रयत मोर्चाचे शिष्टमंडळ नुकतेच मायशुगरच्या पदाधिकाऱ्यांना भेटले आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना १५ जुलैपासून ऊस गाळपाला सुरुवात होणार असल्याची ग्वाही साखर कारखान्याकडून देण्यात आली होती. मायशुगर ही कर्नाटकमधील एकमेव सरकारची भागिदारी असलेली कंपनी आहे.
कारखान्यात ऊस गाळप सुरू होण्याची कोणतीही तयारी दिसत नाही, असे निरीक्षण रयत मोर्चाच्या शिष्टमंडळाने नोंदवले. कारखान्यातील अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर रयतच्या शिष्टमंडळाने माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्हा प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापन ऊस गाळप करण्यास उत्सुक दिसत नाही. त्यामुळे या साखर कारखान्यावर अवलंबून असलेली शेती अडचणीत येणार आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील अर्थकारण बिघडणार आहे. कारखाना व्यवस्थापन शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास तयार नाही, सरकारला या साखर कारखान्याचे खासगीकरण करायचे आहे, असा आरोप भाजपच्या रयत मोर्चाने केला आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील हजारो एकरातील ऊस आता तोडणीला आला आहे. साखर कारखान्यात गाळप हंगामाची तयारी दिसत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. या संदर्भात रयत मोर्चाचे वरिष्ठ नेते म्हणाले, ‘कारखान्यातील अधिकाऱ्यांनी ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू असल्याचे सांगितले. पण, त्यांनी गाळप सुरू होण्याची कोणतीही तारीख सांगण्यास नकार दिला.’
माय शुगर साखर कारखाना १९३४ मध्ये स्थापन झाला आहे. आशिया खंडातील जुन्या साखर कारखान्यांपैकी हा एक कारखाना आहे. सध्या मंड्या, पांडवपुरा आणि श्रीरंगपटणा तालुक्यातील १०२ गावांतील ऊस उत्पादक शेतकरी या साखर कारखान्यावर अवलंबून आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.


