बेळगाव : व्यंकटेश्वरा साखर कारखान्यातर्फे कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली लठ्ठे शिक्षण संस्थेच्या कुसुमावती मिरजी कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात ऊस पीक परिसंवाद झाला. डॉ. शांतिकुमार पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी ऊस तज्ज्ञ डॉ. भूषण गोसावी यांनी बदलत्या काळात अधिक ऊस उत्पादन घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान लाभदायक आहे. त्याद्वारे गरजेनुसार पाणी, खतांची मात्रा, औषध फवारणी, हवामानाचा अंदाज यांची माहिती उपयुक्त ठरणार, असे मत व्यक्त केले.
डॉ. शांतिकुमार पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी ऊस हे शाश्वत पीक आहे. त्याच्या उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण करावे. सेंद्रिय खतांचा वापर करावा. उसाचा पाला जाळून न टाकता मातीत गाडावा. कार्यक्रमाला प्रगतशील शेतकरी कृषी पंडित सुरेश देसाई, अभय खोत, कारखान्याचे जनरल मॅनेजर विश्वनाथ हिरेमठ उपस्थित होते. ऊस विकासाधिकारी अमित नलवडे यांनी स्वागत केले. मान्यवरांचा सत्कार करण्यात झाला. बेडकिहाळ, भोज, गळतगा, कारदगा, शिरदवाड, सदलगा, शमनेवाडी, बोरगाव, नेज, शिरगावावाडी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी उपस्थित होते.