लातूर : किल्लारी साखर कारखाना यंदा तीन लाख टन ऊस गाळप करणार

लातूर : किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाळपासाठी सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. या कारखान्याचे हंगामात तीन लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली. गाळप क्षमता आधुनिकीकरणासह विस्तारीकरण कामाची नवीन मशिनरी उभारणी प्रारंभ व पूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार पवार यांनी दूरध्वनीवरुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मोठ्या अडचणीतून मार्ग काढला आहे. कारखाना प्रतिदिन अडीच हजार टन गाळप क्षमता विस्तारीकरणासह यंदाच्या गाळपासाठी पूर्ण क्षमतेने सज्ज झाला आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

मशिनरी पूजन कार्यक्रम दत्तात्रय पवार गुरुजी व ॲड. परीक्षित पवार यांच्या हस्ते झाला. साखर आयुक्तालयातील सहसंचालक (प्रशासन) प्रवीण फडणीस, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) समृत जाधव प्रमुख उपस्थित होते. त्यांनी कारखान्याचा लेखाजोखा मांडत आमदार पवार यांच्या अथक प्रयत्नामुळे हा कारखाना नव्याने सुरू झाल्याचे सांगितले. आमदार पवार म्हणाले की, सर्वांच्या सहकार्यामुळेच कारखाना आज पुनर्जिवीत होवू शकला. यावर्षी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे परिसरातील साखर कारखानेही सुरळीतपणे चालवण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही. मशिनरी उभारणी कामे संबंधित एजन्सीने वेळेत पूर्ण केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here