सातारा : पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘ज्ञानयाग’ प्रशिक्षणासाठी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यामार्फत ४६ शेतकरी पाठवण्यात आले आहेत. या प्रशिक्षणात प्रति एकरी ऊस उत्पादन वाढावे, तसेच उत्पादन खर्च कमी व्हावा, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कारखान्याचे मार्गदर्शक तथा सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाते.
या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना माती परीक्षण, खत व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर, नवीन ऊस जातीची माहिती, बियाणे मळा याबाबत तज्ज्ञांमार्फत प्रत्यक्ष प्लॉटवर मार्गदर्शन मिळणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, संचालक वसंत पवार, बजरंग जाधव, सुनील निकम, नितीन पाटील, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, शेती अधिकारी विलास पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना रवाना करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी सातारा, कोरेगाव, कऱ्हाड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.