जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक एक अंकुशनगर व सागर सहकारी साखर कारखाना तीर्थपुरी युनिट क्रमांक दोन कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शुक्रवारी (ता. ११) सोशल मीडियाद्वारे तिसरा हप्ता जाहीर करण्यात आला. शेतकऱ्यांच्या खात्यात सोमवार (ता. १४) पर्यंत रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे माजी आमदार राजेश टोपे यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे व्यवस्थापन करावे. उत्पादन वाढवावे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर ऊस शेती, फळपीक शेती या सर्व गोष्टींवर अभ्यास करून सहभाग घेऊन आपली उत्पादकता वाढवावे, असे टोपे म्हणाले.
कारखान्याच्या वतीने यापूर्वी पहिला हप्ता दोन हजार ५०० रुपये, दुसरा हप्ता दोनशे रुपये व तिसरा हप्ता १३२ रुपये असे एकूण दोन हजार ८३२ रुपये प्रतिटन याप्रमाणे देण्यात आले आहेत. हा हप्ता पोळ्याला देण्यात येतो. मात्र, काही शेतकऱ्यांनी मागणी केल्यामुळे पोळ्याच्या सणाआधीच हा हप्ता वाटप केला जात आहे. तिसऱ्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना खते व औषधींसाठी मोठा फायदा होणार आहे.