सोलापूर : कृषी विभाग – आत्माच्यावतीने मेंढापूर (ता. पंढरपूर) येथे जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी मेंढापूर, रोपळे व पांढरेवाडी गावातील शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना खरिपात जास्त उत्पादन देणाऱ्या मका बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी मका तंत्रज्ञानाविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कोल्हापूर येथील अखिल भारतीय समन्वयित मका संशोधन प्रकल्पाचे मका पैदासकार डॉ. सुनील कराड यांनी मार्गदर्शन केले. देशाला लागणाऱ्या इथेनॉलची गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी आता जास्त उत्पादन देणाऱ्या मका पिकाची लागवड करावी, असे आवाहन कराड यांनी केले.
डॉ. कराड यांनी पेट्रोलमध्ये सध्या वीस टक्के इथेनॉल वापरले जाते. तेवढा इथेनॉलचा पुरवठा करण्यासाठी मका पीक नाही, असे सांगितले. ते म्हणाले की, सध्या देशात केवळ नऊ टक्केच मक्याचे उत्पादन घेतले जाते. मका हे शेतकऱ्यांची आर्थिक बाजू भक्कम करणारे पीक आहे, म्हणून मका पीक उसाला पर्यायी पीक ठरले आहे. मका पीक हे इथेनॉल मिळण्याचा मोठा स्रोत आहे. त्यामुळे शासन आता मका पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉ. स्वाती कदम, सुहास भिंगारदिवे, डॉ. रमेश भदाणे, कृषी सहायक आनंद चव्हाण, आत्माचे तालुका तंत्रज्ञ योगेश पवार, निवृत्त पोलिस अधिकारी भास्कर पवार आदी उपस्थित होते. योगेश पवार यांनी आभार मानले.