पुणे : राज्यातील साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. साखर कारखान्यांतील कामगारांना १० टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी यशस्वी तोडगा काढला. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या म्हणण्यानुसार, कामगारांनी १८ टक्के वेतनवाढीची मागणी केली होती. मात्र, तोडगा निघत नव्हता. शरद पवार यांच्यासमवेत त्रिपक्षीय प्रतिनिधींची सोमवारी (ता. १४) बैठक झाली. सर्वांची बाजू ऐकून घेत पवार यांनी अखेर दहा टक्के वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव ठेवला. याला सर्वांकडून मान्यता मिळाली.
साखर कामगारांच्या पाचवर्षीय वेतनवाढीबाबत त्रिपक्षीय समिती नेमली जाते. मागील वेतनवाढ गेल्यावर्षीच समाप्त झाला होता. त्यामुळे २०२९ पर्यंतची सुधारित वेतनवाढ सूचविण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली होती. यात कारखानदार, कामगार, शासकीय प्रतिनिधींचा समावेश होता. समितीच्या चार बैठका होऊनही तोडगा निघाला नव्हता. साखर उद्योगातील कामगारांप्रश्नी गेल्या चार दशकांपासून पवार यांच्याकडूनच तोडगा काढला जातो. त्यामुळे यंदाही त्यांनी मार्ग सूचवावा,अशी भूमिका दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी घेतली. त्यावेळी १८ ऐवजी १० टक्के वेतनवाढीस मंजुरी देण्यात आली.