कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उसाला ‘हुमणी’चा प्रादुर्भाव हा डोकेदुखीचा प्रश्न बनला आहे. याचा सर्वाधिक प्रादुर्भाव शिरोळ तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यातील शेकडो एकर जमीन हुमणीच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. अनियमित पाऊस, वाढती उष्णता यांचा हा परिणाम असल्याचे म्हटले जाते. अशा स्थितीत जोरदार पावसाची प्रतीक्षा करणे हा एकच उपाय शेतकऱ्यांच्या हाती राहिला आहे. जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले तरच हुमणीचा प्रादुर्भाव कमी होणार आहे.
मेच्या अखेरीस मॉन्सूनपूर्व जोरदार पावसामुळे हुमणीचा काही प्रमाणात नायनाट झाला. मात्र, नंतर शिरोळ तालुक्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. ऊन-पावसाचा खेळ, निर्माण झालेली उष्णता यामुळे हुमणीच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण बनले आहे. या अळ्या सध्या लावणीच्या उसाच्या पांढऱ्या मुळ्यांना लक्ष करत आहेत. माळरानावरील हुमणीला पोषक वातावरण निर्माण झाले. आता ऊस लागण केल्यानंतर उसाच्या पांढऱ्या मुळ्या हुमणीचे खाद्य बनले आहे. उसाबरोबरच भुईमूग, उडीद या पिकांची मुळे खाण्याचे लक्ष बनले आहे. नवीन उसाच्या रोपांची कोवळी पांढरी मुळे कुरतडली जात आहेत. मुळाशीच हुमणी लागत असल्याने वरून केलेल्या फवारणीचा उपयोग होत नाही. प्रादुर्भाव रोखण्यासाठी आळवणीचा खर्च मोठा असल्याने शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांना जोरदार पाऊस उपयुक्त ठरेल किंवा आळवणी हा उपाच हुमणी नियंत्रित करू शकतो असे उपकृषी अधिकारी संजय सुतार यांनी सांगितले.